Watve Wadi Mitra Mandal


॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 


लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. आज संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठया आनंदाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव भारतात महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छातीसगडमध्ये ही साजरा केला जातो. भारताबाहेर ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कॅनडा, बर्मा आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये पण साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या डोंबिवली मध्ये सर्वच सण मोठया उत्साहाने साजरे केले जातात.

डोंबिवलीतील वाटवेवाडी मित्र मंडळाने १९७२ साली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाला ४० वर्षे पूर्ण होऊन गेली असली तरी गणेशोत्सवाचा सण लहानथोर तेवढयाच उत्साहाने साजरा करतात.१९७२ साली श्री गणरायाची लहान मूर्ती आणून वाटवे वाडीतील गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला. २४ वर्षे हा उत्सव वाटवे वाडी आणि आसपासच्या परिसरापुरता मर्यादित होता. २५व्या वर्षापासून मात्र कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनत, धडपड व चिकाटीने वाटवे वाडीतील गणेशोत्सव लौकिक अर्थाने डोंबिवलीत नावारूपाला यायला लागला व उत्तरोत्तर त्यात लक्षणीय वाढ झाली.

३५व्या वर्षापासून या गणेशोत्सवाचे स्वरूप फक्त धार्मिक करायचे ठरले. त्या अनुषंगाने "श्री गणेश याग" आयोजिण्यात आला आणि तो दरवर्षी तेवढयाच श्रद्धेने पार पाडण्यात येतो. “श्री गणेश याग” आणि “श्री सत्यनारायण महापूजा” ही वाटवे वाडीतील गणेशोत्सवाची वैशिष्टे मानली जातात. यामुळे मंडळाने  सर्व गणेश भक्तांकडून कौतुकाची दाद मिळवली. तसाच उदंड प्रतिसाद, स्नेहभाव आणि सहकार्य मंडळास मिळावे ही नम्र विनंती. पुढील काळात मंडळातर्फे काही समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. आपल्या मंडळाचा प्रगती आलेख उंचावून सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत होवो, ही सदिच्छा!!!

आपल्या मुंबईसह, महाराष्ट्र तसेच देशावर कोसळलेल्या नैसर्गिक व दहशदवादी संकटावर मत करण्याची प्रेरणा व शक्ती श्री गणेशाच्या कृपेने सामान्य जनतेला तसेच सरकारला लाभो हीच श्रींच्या चरणी नम्र प्राथर्ना व सर्व गणेश भक्तांना उदंड मन:शांती, समाधान व निरोगी दीर्घायु लाभो व आपणा सर्वांचे मन:पूर्वक सहकार्य वृद्धिंगत होवो.


॥ गणपती बाप्पा मोरया ॥